पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी युनूस खतीब
पुणे-नाशिक महामार्गावरील कुरुळी परिसरात भरधाव कंटेनरच्या धडकेत ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातानंतर चालकाने जखमीला मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याने संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक शिवराम अंकुश (वय ६७) हे रस्ता ओलांडण्यासाठी थांबले असताना कंटेनर क्रमांक एमएच १४ केक्यू ३८९१ वरील चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, अपघातानंतर चालकाने जखमी व्यक्तीला उपचारासाठी न नेता तसेच पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप आहे. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी संबंधित कंटेनर चालकास अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.


