पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी युनूस खतीब
हिंजवडी परिसरात बेकायदेशीरपणे देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा) आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी गाव हद्दीतील बोडकेवाडी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी रमेश नागेश भंडारी (वय 43) हा संशयास्पदरीत्या शस्त्र बाळगत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-1 ला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला असता आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा), मॅगझिन आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत लागू असलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून आरोपीने हे शस्त्र विनापरवाना बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.


