पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
थेरगाव परिसरात घरभाड्याच्या पैशांच्या वादातून भाडेकरू दाम्पत्यावर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात घरमालक, त्याचा मुलगा आणि दोन अज्ञात साथीदारांविरोधात काळेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जय हनुमान सुपर मार्केटसमोर, काटे चाळ, श्रीकृष्ण कॉलनी येथे फिर्यादी विकास मधुकर पंडीत (वय 26) यांच्यासोबत घरभाड्याच्या पैशांवरून वाद झाला. यावेळी घरमालक बबन काटे यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्या मुलाने विकास पंडीत यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाण सुरू असताना फिर्यादीची पत्नी पतीला सोडविण्यासाठी मध्ये आली असता आरोपींनी तिलाही बेदम मारहाण केली. दरम्यान, आरोपीच्या मुलाने हातातील लोखंडी कोयत्याच्या उलट्या बाजूने फिर्यादीच्या डोक्यात वार करून जखमी केले. तसेच एका अज्ञात आरोपीने लाकडी दांडक्याने हातावर मारून दुखापत केली.
या हल्ल्यात पती-पत्नी दोघेही जखमी झाले असून काळेवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.


