spot_img
spot_img
spot_img

पिंपळे निलखमध्ये तलवार-रॉड हल्ला; ‘आम्ही इथले भाई’ म्हणत परिसरात दहशत, पाच जणांवर गुन्हा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपळे निलख परिसरात किरकोळ कारणावरून तरुणावर तलवार आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून भांडण सोडविण्यासाठी आलेल्या त्याच्या नातेवाईकालाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, शस्त्रास्त्र कायदा आणि इतर गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.

सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १३ जून २०२६ रोजी रात्री दहाच्या सुमारास पिंपळे निलख येथील शिल्पा हॉटेलजवळ, क्रांतीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर घडली. याप्रकरणी संतोष जनार्दन बालवडकर (वय ४७, रा. गंगा पनामा सोसायटी, पिंपळे निलख) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी ऋषिकेश पाटील (वय २५), अभिषेक भासके (वय १८), जय शिंदे (वय १८) तसेच दोन विधीसंघर्षित बालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

फिर्यादीनुसार, फिर्यादींचा मुलगा कार्तिक हा सेल पेट्रोल पंप परिसरात असताना त्याने ओळखीच्या एका विधीसंघर्षित बालकाकडे पाहिले. याच कारणावरून वाद निर्माण झाला. संतापलेल्या आरोपींनी कार्तिकवर लोखंडी रॉड आणि तलवारीने हल्ला चढवला. त्याच्या डोक्यावर, डाव्या कानावर, चेहऱ्यावर आणि हातावर वार करण्यात आले. या हल्ल्यात कार्तिक गंभीर जखमी झाला.

दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी पुढे आलेला फिर्यादीचा भाचा अनिश शरद मुरकुटे यालाही आरोपींनी लक्ष्य केले. त्याच्या गालावर, ओठावर तलवारीच्या बोथट बाजूने वार करण्यात आला. तसेच खांद्यावर लोखंडी रॉडने मारहाण करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.

हल्ल्यानंतर आरोपींनी हातातील तलवारी आणि रॉड हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. “आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला लागाल तर असेच हाल करू,” अशी धमकी देत आरोपींनी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालेराव करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!