spot_img
spot_img
spot_img

‘रंगीत तालीम’ ज्ञानाकडून आत्मज्ञानाकडे नेणारा काव्यात्मक प्रवास! – राजन लाखे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

”रंगीत तालीम’ हा ज्ञानाकडून आत्मज्ञानाकडे नेणारा काव्यात्मक प्रवास आहे!’ असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी शांता शेळके सभागृह, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक १४ जून २०२६ रोजी व्यक्त केले. प्रज्ञार्थ प्रकाशन निर्मित आणि कवी दामोदर कुलकर्णी लिखित ‘रंगीत तालीम’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात राजन लाखे बोलत होते. ज्येष्ठ निरूपणकार आणि उद्योजक रवींद्र पाठक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच प्रकाशिका प्रज्ञा रामतीर्थकर आणि कवी दामोदर कुलकर्णी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच श्रोतृवर्गाचा उत्तम प्रतिसाद कार्यक्रमास लाभला होता.

राजन लाखे पुढे म्हणाले की, ‘अभियांत्रिकीसारख्या रूक्ष वातावरणात राहूनही कवी दामोदर कुलकर्णी यांनी आपली काव्यप्रतिभा जोपासली आहे; तसेच गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या आध्यात्मिक वाटचालीचाही मी साक्षीदार आहे. मानवी जीवनचक्रातील आध्यात्मिक पैलू विविध कवितांच्या माध्यमातून त्यांनी सहजपणे शब्दांकित केले असल्याने काव्यरसिकाला ते भावतात!’ प्रज्ञा रामतीर्थकर यांनी, ‘ज्ञान, विवेक अन् बुद्धी यांच्या समन्वयातून निर्माण झालेले साहित्य प्रकाशित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत!’ अशी पुस्तकनिर्मिती मागील भूमिका विशद केली. कवी दामोदर कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून, ‘आयुष्यातील बराचसा काळ तप्त धातूसोबत व्यतीत झाला. जीवनाच्या विविध टप्प्यांवर अनेक परिसांचा परीसस्पर्श मला झाला. कुटुंबीयांमध्ये काव्यप्रतिभेचे बीज असलेतरी बेळगावच्या पावनभूमीत पहिली कविता स्फुरली. आप्तेष्टांसह अनेक सुहृदांच्या सहयोगातून ‘रंगीत तालीम’ हा माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. अर्थातच याचे श्रेय परमात्म्यालाच आहे!’ अशी भावना व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतातून रवींद्र पाठक यांनी, ‘समर्थ रामदासस्वामी यांनी धीटकाव्य, पाठकाव्य अन् प्रासादिक काव्य असे काव्याचे प्रकार वर्णन केले असून दामोदर कुलकर्णी यांना प्रासादिक काव्यनिर्मितीचे वरदान लाभले आहे!’ असे मत व्यक्त केले.

मधुरा कुलकर्णी, प्रणव कुलकर्णी, जान्हवी कुलकर्णी, पूर्वा कुलकर्णी, श्रद्धा कुलकर्णी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेतील पदाधिकारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. अक्षया भागवत यांनी सूत्रसंचालन केले. गौरी कुलकर्णी यांनी आभार मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!