पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
मुळशी तालुक्यातील निसर्गरम्य पौड घाट परिसरात शनिवारी सकाळी एका विवस्त्र तरुणाने अक्षरशः धिंगाणा घालत वाहनचालक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. रस्त्याच्या मधोमध उभे राहून वाहनांना अडवणे, सैरभैर पळत सुटणे आणि एका कारवर चढून तिचे सनरूफ फोडणे अशा प्रकारांमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १३) सकाळी सुमारे अकराच्या सुमारास ३५ ते ४० वर्षे वयोगटातील एक तरुण विवस्त्र अवस्थेत पौड घाट परिसरात फिरत होता. शनिवार असल्याने घाट परिसरात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची आणि वाहनांची मोठी गर्दी होती. अशावेळी हा तरुण अचानक रस्त्याच्या मधोमध उभा राहून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडवण्याचा प्रयत्न करू लागला.
या प्रकारामुळे वाहनचालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही काळ घाटातील वाहतूकही संथ झाली. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रमोद बलकवडे आणि कात्रज दूध संघाचे कर्मचारी ज्ञानेश्वर आखाडे यांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्या हातातून निसटून घाट परिसरात पळत सुटला.
पळत असतानाच त्याने एका चारचाकी वाहनावर चढून जोरदार उड्या मारण्यास सुरुवात केली. या प्रकारात वाहनाचे सनरूफ तुटले असून गाडीच्या बॉडीचेही नुकसान झाले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे वाहनातील प्रवासी घाबरून गेले.
यानंतर प्रमोद बलकवडे, ज्ञानेश्वर आखाडे तसेच पौड व्यापारी संघाचे विशाल राऊत यांनी प्रसंगावधान राखत संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. त्याला कपडे परिधान करून सुरक्षितरित्या पौड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
सदर तरुणाची ओळख, त्याची मानसिक स्थिती तसेच तो विवस्त्र अवस्थेत घाट परिसरात कसा पोहोचला याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे काही काळ पौड घाट परिसरात मोठी खळबळ उडाली होती.


