पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने हिंजवडी परिसरात मोठी कारवाई करत ११ लाख ५५ हजार ५०० रुपये किमतीचे एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्ज जप्त केले. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोघे साथीदार फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी दुपारी मुकाईनगर येथील लक्ष्मी चौक रोडवरील औजान मोटर्स गॅरेजसमोर सापळा रचून कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी अक्षय प्रदीप धायगुडे (वय ३१) याच्याकडे ६१ ग्रॅम ७० मिलिग्रॅम वजनाचा एमडी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपींसह एक चारचाकी वाहन, तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्जची बाजारमूल्य ११.५५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चौकशीदरम्यान आरोपींनी हा अंमली पदार्थ अशफाक उर्फ मोनुशेठ काझी आणि हनुमान किलेरी उर्फ बिश्नोई यांच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या दोन्ही संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.
याप्रकरणी अक्षय धायगुडे, दयानंद धायगुडे आणि महेश किचड उर्फ बिश्नोई यांच्याविरोधात एनडीपीएस कायदा कलम ८(क), २२(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस आणि गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक करीत आहे.


