spot_img
spot_img
spot_img

‘हरपाळकर पॅटर्न’ची चर्चा रंगली! MPSC पूर्व परीक्षेची उत्तरतालिका अवघ्या एका दिवसात जाहीर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने 31 मे 2026 रोजी घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2026’च्या चारही संचांच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाने अवघ्या एका दिवसात जाहीर केल्या आहेत. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर 1 जून रोजी या उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आल्या असून, परीक्षेनंतर इतक्या वेगाने उत्तरतालिका जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. त्यामुळे राज्यभरातील स्पर्धा परीक्षार्थींमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून ‘हरपाळकर पॅटर्न’ची चर्चा रंगू लागली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबाबत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात टीका होत होती. अनेकदा राज्य सरकार, लोकप्रतिनिधी तसेच विद्यार्थ्यांनी आयोगाच्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. काही वेळा हा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनातही गाजला होता.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आयोगाच्या परीक्षा आणि निकाल प्रक्रियेला गती देण्यासाठी सुसूत्र नियोजनावर भर दिला आहे. त्यानुसार विविध टप्प्यांसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागल्याची चर्चा आहे.

यंदाची राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा ही यूपीएससीच्या धर्तीवर सुधारित पद्धतीनुसार घेण्यात आलेली दुसरी परीक्षा होती. परीक्षेसाठी आयोगाने उमेदवारांसाठी कठोर नियमावली लागू केली होती. मूळ हॉल तिकीट, ओळखपत्राची मूळ प्रत व छायांकित प्रत बाळगणे अनिवार्य करण्यात आले होते. तसेच वेळेचे काटेकोर पालन न करणाऱ्या किंवा गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता.

रविवारी परीक्षा पार पडल्यानंतर सोमवारीच उत्तरतालिका जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक उमेदवारांनी या निर्णयाचे स्वागत करत आयोगाच्या कार्यपद्धतीत झालेल्या बदलाचे कौतुक केले आहे. आता याच वेगाने पुढील टप्प्यांचे निकाल आणि प्रक्रिया पार पडतात का, याकडे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!