पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
भोसरी येथील एका चालकाची वाहन खरेदीच्या व्यवहारात आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद सरवदे (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी त्यांचे टाटा कंपनीचे वाहन फेब्रुवारी २०२४ मध्ये मुदस्सिर मोहम्मद इसहाक (रा. मालेगाव, जि. नाशिक) याला करारनाम्याद्वारे विकले होते. वाहनावरील फायनान्स कंपनीचे कर्जाचे हप्ते भरण्याची जबाबदारी आरोपीने स्वीकारली होती. सुरुवातीला काही हप्ते भरल्यानंतर त्याने पुढील हप्ते भरणे बंद केले.
तसेच वाहन स्वतःच्या नावावर हस्तांतरित न करता ते अन्य व्यक्तीच्या ताब्यात दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान, संबंधित वाहनाविरोधात नाशिक वन विभागाने अवैध वाहतूक प्रकरणी कारवाई केल्याने त्याबाबतची नोटीस मूळ मालक असलेल्या फिर्यादीला प्राप्त झाली. यामुळे आर्थिक व कायदेशीर अडचणीत सापडलेल्या फिर्यादीने भोसरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
भोसरी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.




Total Users : 227594