शबनम न्यूज | प्रतिनिधी
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने पोस्को गुन्ह्यातील फरार आरोपीला लातूर जिल्ह्यातील उदगीर येथून अटक करण्याची कारवाई केली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोशी परिसरात एका अल्पवयीन मुलीला मारहाण, शिवीगाळ तसेच छेडछाड केल्याप्रकरणी समीर केदारनाथ शिंदे (रा. लक्ष्मीनगर, मोशी, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २७२/२०२६ अन्वये बीएनएस कलम ७८(२), ३५२, ११५(२), ३२४ तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) अधिनियम कलम १२ अंतर्गत गुन्हा नोंद होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता.
तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हा त्याच्या मूळ गावी गुरदाळ (ता. उदगीर, जि. लातूर) येथे असल्याचे समोर आले. त्यानुसार एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने उदगीर येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. आरोपी कर्नाटकात जाण्यासाठी निघाला असताना उदगीर बस डेपो परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले आणि संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली.
अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश खडसे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडली.


