शबनम न्यूज | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी आणि ग्रंथसंपदेचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांना मिळावा या उद्देशाने के. के. गोयल फाउंडेशनतर्फे खडकी शिक्षण संस्थेला तब्बल ६५० पुस्तकांची अनमोल भेट देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते विविध शाळांच्या मुख्याध्यापकांकडे पुस्तकांचे सुपूर्द करण्यात आले.
के. के. गोयल यांच्याकडे विविध व्यक्तींकडून भेट स्वरूपात आलेल्या शेकडो पुस्तकांचा मोठा संग्रह होता. ही पुस्तके केवळ संग्रहित न राहता विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडावीत आणि त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी, या हेतूने ती खडकी शिक्षण संस्थेच्या शाळांना देण्याचा निर्णय फाउंडेशनने घेतला.
यावेळी बोलताना कृष्णकुमार गोयल म्हणाले, “अनेक जण नव्याने प्रकाशित झालेली पुस्तके, नियतकालिके आणि विशेषांक भेट देतात. ही पुस्तके आणखी कुणाला वाचण्यासाठी उपयुक्त ठरतील, हा विचार मनात आल्याने ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला.”
खडकी शिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना ही पुस्तके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला टी. जे. कॉलेजचे प्राचार्य डॉ. स्वरूप चाको, के. के. गोयल कॉलेजचे प्राचार्य उद्धव घाडगे, जी. एम. आय. कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा चपे, चेतन दताजी गायकवाड कॉलेजच्या उपप्राचार्या शाई शेख, ग्रंथपाल आनंद नाईक, निखिल पंडुले आदी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील दर्जेदार साहित्य वाचनासाठी उपलब्ध होणार असून त्यांच्या ज्ञानवृद्धीसह वाचन संस्कृतीलाही चालना मिळणार आहे.


