spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड महापालिकेची २५० कोटींच्या मालमत्ता कराची वसुली

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या प्रारंभी मालमत्ता कर वसुलीत लक्षणीय प्रगती नोंदविली आहे. १ एप्रिल ते २९ मे २०२६ या कालावधीत महापालिकेकडे २५० कोटी ७२ लाख रुपयांहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. 

महापालिकेच्या माहितीनुसार, आतापर्यंत शहरातील २ लाख ४७ हजार ३७१ मिळकतधारकांनी मालमत्ता कर भरला आहे. यामध्ये डिजिटल माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे दिसून आले असून, २ लाख २१ हजार ७६३ नागरिकांनी ऑनलाइन कर भरणा करून १० टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. या माध्यमातून २३० कोटी ५७ लाख रुपयांहून अधिक महसूल जमा झाला आहे. 

शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र वापराच्या तसेच मोकळ्या जागांसह एकूण ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मालमत्ता आहेत. चालू आर्थिक वर्षाची कर देयके संबंधित मालमत्ताधारकांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका उप आयुक्त सचिन पवार यांनी यावेळी सांगितले. 

महापालिकेकडून महिलांच्या नावावरील मालमत्ता, दिव्यांग नागरिक तसेच पर्यावरणपूरक निवासी गृहनिर्माण संस्थांसाठी विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. तसेच ३० जून २०२६ पूर्वी ऑनलाइन कर भरणाऱ्या नागरिकांना १० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात असल्याने ऑनलाईन कर भरण्यास नागरिक पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. 

मालमत्ता कराच्या वेळेवर होणाऱ्या भरण्यामुळे शहरातील विकासकामांना आर्थिक बळ मिळते. ऑनलाइन कर भरण्यास नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद समाधानकारक असून, अद्याप कर न भरलेल्या नागरिकांनी ३० जून २०२६ पूर्वी कर भरून उपलब्ध सवलतींचा लाभ घ्यावा.  

-डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका  

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!