पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
बावधन परिसरात रोडवर पाणी मारण्याच्या किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत हातोडी आणि दगडाने हल्ला करण्यात आल्याने अनेकजण जखमी झाले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुंडे वस्ती, क्षत्रियनगर येथे रोडवर पाणी टाकल्यामुळे आरोपी आणि फिर्यादी यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. आरोपी राधिका राजपुत हिने फिर्यादी यश राजपुत यांच्या डोक्यात हातोडी मारून तसेच दगड फेकून गंभीर जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या प्रताप राजपुत यांनाही दगड मारून जखमी करण्यात आले.
तसेच इतर आरोपींनी महिलांसह कुटुंबातील सदस्यांना मारहाण करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
ही घटना २७ मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११२, ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.


