शबनम न्यूज | प्रतिनिधी
रावेत परिसरातील एका बांधकाम साईटवर बेकायदा ब्लास्टिंग करताना झालेल्या भीषण स्फोटात कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष आणि निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकाई चौक ते भक्ती शक्ती चौक नव्या बीआरटी रोडलगत असलेल्या “१०८ आस्टोरिया” बांधकाम साईटवर ब्लास्टिंगचे काम सुरू होते. संबंधित कॉन्ट्रॅक्टरांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तसेच पोलिसांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून कंट्रोल ब्लास्टिंग केले होते.
ब्लास्टिंगनंतर सर्व जिलेटिन कांड्यांचा स्फोट झाला की नाही, याची खातरजमा न करताच कामगार बबलू शेख याला पुन्हा त्या ठिकाणी ड्रिल मशीनने छिद्र पाडण्यास सांगण्यात आले. त्यावेळी अचानक स्फोट होऊन बबलू शेख गंभीर जखमी झाला. स्फोटात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून परिसरात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणी रावेत पोलिसांनी कॉन्ट्रॅक्टर शशिकांत श्रीवास्तव आणि सचिन चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.




Total Users : 227622