spot_img
spot_img
spot_img

राज्य सहकारी बँकेचे अत्याधुनिक ‘सायबर सुरक्षा केंद्र’ सुरू; जिल्हा बँकांना मोठा दिलासा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे : वाढत्या सायबर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर Maharashtra State Cooperative Bank ने नवी मुंबईतील वाशी येथे अत्याधुनिक ‘सायबर सुरक्षा केंद्र’ उभारले असून, या केंद्रामुळे बँकांच्या सर्व्हरवरील सायबर हल्ले रोखण्यात मोठे यश मिळत असल्याची माहिती राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांनी दिली.

या सुविधेचा वापर आता Pune District Central Cooperative Bank मध्येही करण्यात येणार असून, राज्यातील इतर चार जिल्हा बँकांनीही या प्रणालीचा वापर सुरू केला आहे. दरम्यान, राज्यातील सर्व जिल्हा बँकांनी ही सुविधा वापरावी, असे आदेश सहकार विभागाचे सचिव प्रवीण दराडे यांनी जारी केल्याचेही अनासकर यांनी स्पष्ट केले.

काही वर्षांपूर्वी पुण्यातील Cosmos Bank वर झालेल्या सायबर हल्ल्यानंतर राज्य सहकारी बँकेलाही अशाच धोक्याची जाणीव झाली होती. त्यानंतर जिल्हा बँकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र सायबर सुरक्षा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

विद्याधर अनासकर यांनी सांगितले की, राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा बँकांमधील ठेवी सुरक्षित राहाव्यात, यासाठी सुमारे ४० कोटी रुपये खर्चून वाशी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हे केंद्र उभारण्यात आले. अडीच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या केंद्रात सध्या ३५ संगणक अभियंते कार्यरत आहेत.

आजमितीला राज्य सहकारी बँकेसह सिंधुदुर्ग, सातारा आणि अन्य जिल्हा बँकांचे ‘लिस्टिंग’ या केंद्राशी करण्यात आले आहे. पुणे जिल्हा बँकेलाही लवकरच ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

गेल्या अडीच वर्षांत देश-विदेशातून अनेक वेळा सायबर हल्ल्यांचे प्रयत्न झाले. मात्र, वाशी येथील सायबर सुरक्षा केंद्राच्या माध्यमातून हे सर्व हल्ले यशस्वीपणे परतवून लावण्यात आले, असा दावा अनासकर यांनी केला. विशेष म्हणजे, जिल्हा बँकांची शिखर संस्था म्हणून राज्य सहकारी बँक ही सायबर सुरक्षा सेवा जिल्हा बँकांना मोफत उपलब्ध करून देत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!