पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
खेड तालुक्यातील काळुस गावात रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या पत्यांच्या जुगार अड्ड्यावर उत्तर चाकण पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी चार जणांविरोधात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.२५) रात्री काळुस गावाच्या हद्दीत काही जण एका लाईटच्या उजेडात गोलाकार बसून ‘तिरट’ नावाचा पत्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान संभाजी पोटवडे, परमेश्वर पवळे, संतोष पोटवडे आणि ज्ञानेश्वर पवळे हे जुगार खेळताना आढळून आले.
पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम व जुगाराचे पत्ते असा एकूण ३ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस हवालदार ढमढेरे करीत आहेत.




Total Users : 227650