शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी : वुई टुगेदर फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने पिंपरी येथील ‘सावली निवारा’ वृद्धाश्रमात निराधार वृद्धांसाठी मदत उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत वृद्ध महिला आणि पुरुषांना कपडे, प्रथमोपचार पेटी, अत्यावश्यक औषधे तसेच खाऊ वाटप करण्यात आले.
वुई टुगेदर फाउंडेशन ही संस्था गोरगरीब, वंचित, निराधार, अंध, अपंग तसेच ग्रामीण भागातील गरजू लोकांसाठी सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. समाजातील दुर्लक्षित घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने संस्था कायम कार्यरत असते.
पिंपरीतील ‘सावली निवारा’ वृद्धाश्रमात शहरातील विविध भागांतील निराधार वृद्धांना आश्रय देण्यात येतो. या वृद्धांचे संगोपन पूर्णपणे निशुल्क केले जात असल्याने आश्रमाला विविध स्वरूपातील मदतीची गरज भासत असते. याच पार्श्वभूमीवर वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने हा मदत उपक्रम आयोजित करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यावेळी बोलताना मधुकर बच्चे म्हणाले, “या आश्रमातील वृद्ध महिला आणि पुरुष हे आमच्यासाठी आशीर्वादासारखे आहेत. त्यांच्या सेवेसाठी आमच्या हातून कायम कार्य घडत राहो आणि त्यांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर राहू.”
या कार्यक्रमाच्या आयोजनात संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे-सपकाळे, खजिनदार दिलीप चक्रे, सल्लागार कुशाल दुसाने, माजी अध्यक्ष सलीम सय्यद, विलास गटने, रंगाराव कुकाला, रोहिणी बच्चे, सुषमा कोरे आदींनी सहभाग घेतला.


