शबनम न्यूज | प्रतिनिधी
रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी हा ऐतिहासिक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवत नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. १ मे २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
चित्रपट प्रदर्शित होऊन २४ ते २५ दिवस उलटल्यानंतरही राज्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये ‘राजा शिवाजी’चे शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. प्रेक्षकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तोंडी प्रसिद्धीमुळे सिनेमाची कमाई सातत्याने वाढताना दिसत आहे.
‘राजा शिवाजी’ने भारतात तब्बल १०१.४० कोटी रुपयांची कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला आहे. जगभरातील कमाईचा आकडा १२० कोटी रुपयांच्या पुढे गेला असून, अशी कामगिरी करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे.
बॉक्स ऑफिसवरील कमाईचे आकडेही दमदार आहेत. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ५७.७० कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात २७ कोटींचा गल्ला जमावला, तर तिसऱ्या आठवड्यातही ८.४० कोटी रुपयांची कमाई करत सिनेमाने आपली घोडदौड कायम ठेवली.
दरम्यान, प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही सिनेमाचे कौतुक होत आहे. ‘बुक माय शो’ आणि IMDb वर चित्रपटाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून, IMDb वर सिनेमाला दहापैकी ८.३ इतके दमदार रेटिंग मिळाले आहे. ‘मुंबई फिल्म कंपनी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून ही माहिती शेअर करण्यात आली आहे.


