spot_img
spot_img
spot_img

‘कॉकरोच जनता पार्टी’वर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी; “इतके भावूक होऊ नका”

शबनम न्यूज | प्रतिनिधी

नवी दिल्ली : ‘कॉकरोच जनता पार्टी’ या सोशल मीडियावरील उपरोधिक मोहिमेची दखल आता थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आहे. ‘यंत्रणेवर सतत हल्ले करणाऱ्या काही लोकां’बाबत केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या या वादावर सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी महत्त्वाची टिप्पणी करत, “या विषयाकडे इतके भावूक होऊन पाहू नका,” असा सल्ला संबंधित वकिलाला दिला.

काही दिवसांपूर्वी न्यायालयीन निरीक्षणादरम्यान सरन्यायाधीशांनी समाजातील काही व्यक्तींवर टीका करताना “काही तरुण हे ‘कॉकरोच’सारखे असतात. त्यांना कायद्याच्या क्षेत्रात किंवा इतरत्र काम मिळत नाही, त्यामुळे ते पत्रकारिता, सोशल मीडिया किंवा RTI कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर सतत चिखलफेक करत राहतात,” असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे पडसाद देशभरातील सोशल मीडियावर उमटले.

या वक्तव्याचा निषेध नोंदवत अमेरिकेत वास्तव्यास असलेले महाराष्ट्रातील ३० वर्षीय अभिजित दिपके यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाचे डिजिटल व्यासपीठ सुरू केले. अल्पावधीतच ही मोहीम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. अनेकांनी या मोहिमेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी जोडत समर्थन दिले, तर काहींनी न्यायालयीन व्यवस्थेची खिल्ली उडवल्याचा आरोप केला.

दरम्यान, केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘कॉकरोच जनता पार्टी’चे ‘X’ खाते भारतात ब्लॉक केल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर अभिजित दिपके यांनी ‘कॉकरोच इज बॅक’ नावाने नवीन खाते सुरू करत समर्थकांना पुन्हा जोडण्याचे आवाहन केले.

या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयीन कामकाजातील संवादाचा राजकीय किंवा व्यावसायिक गैरवापर रोखण्यासाठी निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत, योग्य वेळी नियमित सुनावणी केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!