शबनम न्यूज | प्रतिनिधी
हिंदू साम्राज्य दिनाचे औचित्य साधत सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान, संकल्प सोशल फाउंडेशन, सकल हिंदू समाज तुळजा भवानी वस्ती तसेच खांदेश तिळवण तेली समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजहिताच्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने परिसरात सामाजिक ऐक्य आणि सेवाभावाचे दर्शन घडले.
या रक्तदान शिबिरात युवकांसह विविध वयोगटातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत रक्तदान केले. “रक्तदान हेच श्रेष्ठदान” या भावनेतून अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली. शिबिरादरम्यान रक्तदात्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

यावेळी पिंपरी-चिंचवड मनपाच्या नगरसेविका रेश्मा बापू कातळे तसेच बापूजी दिनकर कातळे यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रक्तदात्यांच्या या योगदानाचे त्यांनी कौतुक करत भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास सह्याद्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सभासद, तिळवण तेली समाजाचे सदस्य तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक जाणीव जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



