पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
थेरगाव परिसरात मध्यरात्री कोयत्यांचा धाक दाखवत तरुणांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. “आम्ही पिंपरी-चिंचवडचे भाई आहोत” अशी धमकी देत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी काळेवाडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एक साथीदार फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ विलास चौधरी (वय २४) हे मित्रांसोबत थेरगाव येथील समर्थ क्लिनिकसमोर उभे असताना आरोपी गौरव ऊर्फ नन्या गौतम वाघमारे, रितेश क्षीरसागर आणि त्यांचा एक अनोळखी साथीदार अॅक्सेस दुचाकीवरून तेथे आले.
यावेळी आरोपी गौरव वाघमारे याने शिवीगाळ करत कमरेतील लोखंडी कोयता काढून सौरभ चौधरी यांच्या डोक्यात आणि हातावर सपासप वार केले. त्यानंतर दुसऱ्या आरोपीनेही कोयत्याने हल्ला करत गंभीर जखमी केले. तिसऱ्या साथीदारानेही हल्ल्यात सहभाग घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
हल्ल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या मित्रांनाही कोयते दाखवत “मध्ये आलात तर खल्लास करू” अशी धमकी दिली. तसेच हवेत कोयते फिरवत “आहे का कुणी टक्कर देणार?” असे म्हणत परिसरात दहशत माजवली.
या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि नलावडे करीत आहेत.




Total Users : 227670