पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड शहरातील स्पाईन रोडवर बुधवारी रात्री भीषण अपघात घडला असून भरधाव ट्रकच्या धडकेत स्कुटीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात दि. २० मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कलावंतीन महालमाता सर्व्हिसिंग सेंटरसमोर, स्पाईन रोड, एमआयडीसी भोसरी परिसरात घडला.
मृत व्यक्तीचे नाव उत्तम रणपिसे असे असून ते चिखली येथील शिवमुद्रा हाऊसिंग सोसायटीत वास्तव्यास होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी चालक किशोर हरीचंद्र जाधव (वय ५०, रा. नाणेकरवाडी, चाकण) हा टाटा कंपनीचा ट्रक (MH 14 JL 5733) भरधाव आणि बेदरकारपणे चालवत होता. वाहतुकीचे नियम व सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत ट्रक चालवित असताना त्याने रणपिसे यांच्या स्कुटीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे रणपिसे हे स्कुटीसह रस्त्यावर कोसळले. त्यानंतर ट्रकचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली होती.
या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात बीएनएस कलम १०६ (१), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक मणेर पुढील तपास करीत आहेत.


