spot_img
spot_img
spot_img

CCTV च्या धाग्यावरून चिंचवड पोलिसांची मोठी कामगिरी; ३ वर्षांची चिमुकली आणि दीड महिन्याच्या बाळाला मुंबईतून सुखरूप शोधले

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

चिंचवड पोलिसांनी अत्यंत गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील मिसिंग प्रकरणाचा कौशल्यपूर्ण तपास करत मुंबईतून तीन वर्षांच्या चिमुकलीसह दीड महिन्याच्या नवजात बाळाचा सुखरूप शोध घेत मोठी कामगिरी केली आहे. कोणताही ठोस धागादोरा नसताना केवळ CCTV फुटेज, तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण शोध मोहिमेच्या जोरावर पोलिसांनी हे मिशन यशस्वी केले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये मनुष्य बेपत्ता क्रमांक 45/2026 अंतर्गत तक्रारदार महेंद्र रौंदळ (रा. पाईट, ता. खेड) यांनी पत्नी दिपाली महेंद्र रौंदळ (वय 31) हिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दिपाली ही मतिमंद असून आठ महिन्यांची गरोदर होती. ती तिची तीन वर्षांची मुलगी तनिष्का हिला घेऊन माहेरी वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे आली होती.

दरम्यान, दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी ती कोणालाही काहीही न सांगता लहान मुलीला घेऊन घरातून निघून गेली. नातेवाईकांनी परिसरात आणि ओळखीच्या ठिकाणी शोध घेतला, मात्र काहीच माहिती मिळाली नाही. अखेर पतीने चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दाखल केली.

तपासादरम्यान दिपाली ही 14 एप्रिल रोजी डोंबिवली येथे तिच्या मामीच्या घरी आढळून आली. मात्र तिच्यासोबत ना तीन वर्षांची मुलगी होती ना पोटातील बाळ. पोलिसांनी तिच्याकडे विचारपूस केली असता ती मतिमंद असल्याने कोणतीही स्पष्ट माहिती देऊ शकत नव्हती.

यानंतर तपासाची सूत्रे पोलिस हवालदार काझी आणि पोलिस शिपाई जगताप यांच्या हाती देण्यात आली. दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी ठाणे, डोंबिवली, रेल्वे स्टेशन, बस डेपो, सरकारी रुग्णालये आणि अनाथ आश्रम येथे चौकशी केली. मात्र कुठलाही ठोस पुरावा मिळत नव्हता.

तपास सुरू असतानाच दिपालीचा दुसरा मामा घाटकोपर येथे राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन परिसरातील दुकानदार, हॉटेल चालक आणि स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली. त्यावेळी दीड महिन्यापूर्वी एका गरोदर महिलेला लहान मुलीसह परिसरात पाहिल्याचे काहींनी सांगितले.

यानंतर पोलिसांनी घाटकोपरमधील गणेश नगर, साईनाथ नगर परिसरातील CCTV फुटेज तपासले. त्यामध्ये दिपाली ही 2 एप्रिलच्या रात्री 11.05 वाजता लहान मुलीसह हनुमान मंदिराबाहेर बसलेली दिसून आली. पुढील तपासात स्थानिक नागरिकांकडून महत्त्वाची माहिती मिळाली की, त्या महिलेला आणि मुलीला चिरागनगर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

पोलिसांनी तत्काळ चिरागनगर पोलीस स्टेशन गाठले. तेथे संबंधित महिला आणि मुलीला वात्सल्य फाउंडेशन, चेंबूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली. पुढील चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. दिपाली गरोदर असल्याने तिला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 7 एप्रिल रोजी तिची डिलिव्हरी झाली होती. मात्र डिलिव्हरीनंतर काही दिवसांनी ती नवजात बाळाला हॉस्पिटलमध्ये सोडून फरार झाली होती. याप्रकरणी वात्सल्य फाउंडेशनने सायन पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची नोंदही केली होती.

पोलिस हवालदार काझी आणि पोलिस शिपाई जगताप यांनी वात्सल्य ट्रस्टमध्ये जाऊन तपास केला असता, तीन वर्षांची मुलगी आणि नवजात बाळ दोघेही सुखरूप असल्याचे समोर आले. त्यानंतर मुलांचे वडील आणि आई यांना मुंबईत बोलावण्यात आले. घाटकोपर पोलिसांच्या मदतीने बाल कल्याण समिती (CWC) मानखुर्द यांच्या समोर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि दोन्ही मुलांचा ताबा त्यांच्या आई-वडिलांकडे देण्यात आला.

त्यानंतर चिंचवड पोलिसांनी दोन्ही मुलांना सुखरूप चिंचवड येथे आणून कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.

या संपूर्ण प्रकरणात पोलिस हवालदार काझी आणि पोलिस शिपाई जगताप यांनी कोणताही ठोस धागादोरा नसताना केवळ CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे मुंबईसारख्या महानगरातून दोन चिमुकल्यांचा शोध घेत अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या तपासकौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!