युनूस खतीब | प्रतिनिधी
चिंचवड परिसरात बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची ५ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुजितकुमार काकासो भोसले (वय ४०, रा. टीसीजी पॅनोरमा सोसायटी, आंबेगाव पठार, पुणे) यांना आरोपी प्रशांत मोहन गायकवाड (वय अंदाजे ३५, रा. खेड राजगुरूनगर, पुणे) याने संपर्क साधून बँकेत गहाण ठेवलेले ६० ग्रॅम सोने सोडवण्यासाठी ५ लाख १० हजार रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
दि. १५ मे २०२६ रोजी दुपारी ४:३० ते दि. २० मे २०२६ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत जनता सहकारी बँक, चिंचवड स्टेशन समोर, उत्तम स्वीटजवळ हा व्यवहार झाला. आरोपीने फिर्यादीसोबत लेखी करार करून विश्वास संपादन केला आणि सदर रक्कम स्वतःच्या जनता सहकारी बँकेतील खाते क्रमांक ०११२२०१०००५६४४१ वर जमा करण्यास भाग पाडले.
मात्र, पैसे घेतल्यानंतर आरोपीने गहाण ठेवलेले सोने न सोडविता परस्पर बँकेतून निघून जात फिर्यादीची फसवणूक केली.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गु.रजि. नं. २९०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि केणे करीत आहेत.


