पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
पुण्यातील बावधन परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून एका १८ वर्षीय तरुणावर लोखंडी हत्यार आणि दांडक्याने हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १२ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोरील कट्ट्यावर घडली. फिर्यादी आर्यन अंकुश पिसोळे (वय १८, रा. बावधन) हे मित्रांसोबत गप्पा मारत बसले असताना आरोपी सोनु लाटे, विकी लाटे आणि अतुल माने यांनी तेथे येत जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ सुरू केली.
वाद वाढल्यानंतर आरोपी विकी लाटे याने लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या कोपराखाली वार केला. त्यानंतर आरोपी सोनु लाटे आणि अतुल माने यांनी फिर्यादीला पकडून मारहाण केली. तसेच सोनु लाटे याने लाकडी दांडक्यानेही बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत फिर्यादी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी “पुन्हा दिसलास तर मारून टाकू” अशी धमकी दिल्याचेही पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.
दरम्यान, भर रस्त्यात तरुणावर झालेल्या या हल्ल्यामुळे बावधन परिसरात खळबळ उडाली असून, परिसरातील नागरिकांनी वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली आहे.


