पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्याने बनावट चावीचा वापर करून घरात प्रवेश करत तब्बल ११ लाख २८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ४ मे ते १२ मे २०२६ दरम्यान थेरगाव येथील लक्ष्मणनगर, महादेव कॉलनी परिसरातील लक्ष्मीबाई बारणे उद्यानाजवळील फिर्यादी महिलेच्या राहत्या घरात घडली. आरोपीने बनावट चावीच्या सहाय्याने घरातील बेडरूमचे लॉक उघडून दिवाणातील ट्रॅव्हलिंग बॅगमध्ये ठेवलेले १४ तोळे १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत अंदाजे ११ लाख २८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. घरातील कपाटे किंवा इतर वस्तूंना धक्का न लावता थेट दागिन्यांवर डल्ला मारण्यात आल्याने आरोपीला घरातील माहिती होती का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
या प्रकरणी योगेश लहु जाधव (वय २६, रा. लक्ष्मणनगर, थेरगाव, मूळ गाव घोरवाडी, ता. हुमनाबाद, जि. बिदर) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे.
वाकड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३), ३३१ (४) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे थेरगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी घर सुरक्षिततेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे.


