spot_img
spot_img
spot_img

एपीके फाईल डाउनलोडचा सापळा; निवृत्त ज्येष्ठ नागरिकाची तब्बल पाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड शहरात सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना लक्ष्य केले जात असून, निगडी परिसरातील एका निवृत्त ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ४ लाख ९९ हजार ७७४ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सदानंद सदाशीव गोखले (वय ७७, रा. नंदादीपश्री हौसिंग सोसायटी, सेक्टर २६, निगडी प्राधिकरण) यांना ८ मे ते ९ मे २०२६ दरम्यान त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून एपीके फाईल पाठविण्यात आली होती. संबंधित फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडून आरोपींनी त्यांच्या मोबाईलचा अॅक्सेस मिळविला.

यानंतर सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डमधून विविध व्यवहार करत तब्बल ४ लाख ९९ हजार ७७४ रुपये काढून आर्थिक फसवणूक केली. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर गोखले यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) तसेच माहिती तंत्रज्ञान (सुधारित) कायदा २००८ अंतर्गत कलम ६६ (ड) अन्वये अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि फटांगरे करीत आहेत.

दरम्यान, कोणतीही अनोळखी एपीके फाईल, लिंक किंवा अॅप डाउनलोड करू नये, तसेच बँकिंग माहिती मोबाईलद्वारे शेअर करताना सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!