शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुण्यातील दिवे घाट परिसरात मध्यरात्री बुलेटस्वारांच्या टोळक्याने अक्षरशः धिंगाणा घालत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास ८० ते १०० बुलेटस्वारांनी एकत्र येत मॉडिफाईड सायलेन्सरचे मोठमोठ्याने फटाके वाजवत घाट परिसर दणाणून सोडला.
प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले की, भरधाव वेगाने दुचाकी चालवत काही तरुणांनी जोरदार स्टंटबाजी केली. मॉडिफाईड सायलेन्सरमधून होणाऱ्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे परिसरातील नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक वाहनचालक काही काळ थांबून परिस्थिती पाहत असल्याचेही सांगण्यात आले.
या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ काही नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून, त्यामध्ये एका युवकाच्या हातात धारदार वस्तू असल्याचेही दिसून येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकाराकडे केवळ वाहतूक नियमभंग म्हणून नव्हे, तर कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न म्हणून पाहिले जात आहे.
दिवे घाट हा पर्यटनासाठी तसेच रात्रीच्या वेळी प्रवासासाठी महत्त्वाचा मार्ग मानला जातो. मात्र अशा प्रकारच्या बुलेटस्वारांच्या टोळक्यांमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित बुलेटस्वारांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून पोलिस प्रशासन या प्रकरणाची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Total Users : 225089