कबीर कांबळेच्या रूपाने पिंपरी-चिंचवडचा हिरा चमकला – आमदार अमित गोरखे
शबनम न्यूज | प्रतिनिधी
कोणताही महागडा क्लास न लावता, केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यूपीएससी सारख्या देशातील सर्वोच्च परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात १२५ वा क्रमांक पटकावणे, हे कबीर राहुल कांबळे याचे यश थक्क करणारे आहे. कबीरने मिळवलेले हे यश सामान्य बुद्धिमत्तेचे काम नसून, त्याच्या असामान्य कष्टाची ही पावती आहे. खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला सुशिक्षित समाज कबीरच्या रूपाने आकाराला येत आहे, अशा शब्दांत आमदार अमित गोरखे यांनी कबीरच्या यशाचे कौतुक केले.
अजमेरा-मासूळकर कॉलनीतील कबीर कांबळे याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल आमदार अमित गोरखे यांनी त्याच्या घरी जाऊन त्याचे आणि त्याच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले.
घरात बसून ‘स्वबळावर’ मिळवले यश
आजच्या काळात स्पर्धा परीक्षेसाठी लाखांच्या पटीत फी भरून क्लासेस लावले जातात. मात्र, कबीरने कोणत्याही क्लासचा आधार न घेता, घरात बसून दिवसाचे अनेक तास अभ्यासाला दिले. कबीर केवळ अभ्यासातच नाही तर तो ‘मल्टिटॅलेंटेड’ देखील आहे; त्याला गिटार वाजवण्याचीही आवड आहे. अभ्यासाच्या तणावातही त्याने आपली ही कला जोपासली आहे.
आई-वडिलांच्या कष्टाचे चीज
याप्रसंगी आमदार अमित गोरखे भावूक होऊन म्हणाले की, कबीरच्या यशात त्याच्या आई-वडिलांच्या कष्टाचा वाटा मोलाचा आहे. आपल्या मुलाने देशाच्या सेवेसाठी उच्च पदावर जावे, हे स्वप्न पाहणाऱ्या या पालकांचेही कौतुक करावे तितके थोडेच आहे. कबीरसारखे अनेक तरुण आज यूपीएससी आणि एमपीएससीच्या माध्यमातून समाजसेवेसाठी पुढे येणे ही काळाची गरज आहे. सुशिक्षित आणि कर्तृत्ववान समाज निर्माण होणे, हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल.
आमदार गोरखे यांनी कबीरला पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा देताना विश्वास व्यक्त केला की, कबीर हा केवळ अधिकारी होणार नाही, तर तो समाजातील शेवटच्या घटकाचा आवाज बनून काम करेल. या यशाबद्दल संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातून कबीरवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एका सामान्य तरुणाचा हा असामान्य प्रवास आज संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.


