spot_img
spot_img
spot_img

‘अंतर्नाद’ या संगीत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवारी चिंचवड मध्ये

भक्ती, संगीत आणि आत्मशोधाचा प्रवास घडवणारे भव्य नाटक – भाऊसाहेब भोईर 
शबनम न्यूज | प्रतिनिधी
 पंढरीची वारी हा जगातील एकमेव सोहळा आहे की, या सोहळ्यात सर्व अठरा पग्गड जाती एकत्र येऊन वारी मध्ये सहभागी होतात. देहू, आळंदी पासून पंढरपूर पर्यंत वारीत सहभागी होण्याचे आत्मिक समाधान हे अडीच तासात देण्याचा प्रयत्न “अंतर्नाद” या संगीत नाटकातून प्रेक्षकांना मिळेल. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या पसंतीला उतरेल असा ५१ कलाकारांचा सहभाग असलेल्या या प्रयोगात अभंग, गवळण, भारुड, पोवाड्याचा समावेश या सात्विक कार्यक्रमात आहे. अंतर्मनातील नाद समजून घेण्यासाठी आणि स्वतः मधला विठ्ठल शोधण्यासाठी सर्वांनी
‘अंतर्नाद’ या संगीत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवारी, (दि.१६) सायंकाळी ७ वाजता, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात येऊन पहावा असे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष व मोरया थिएटरचे संस्थापक, “अंतर्नाद” चे निर्माते भाऊसाहेब भोईर यांनी केले. 
     पिंपरी आचार्य अत्रे सभागृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत  भोईर बोलत होते. यावेळी प्रणव सपकाळे, मनोज डाळिंबकर, निरंजन पेडगावकर, अंकिता शिवतरे, राजू बंग आदी उपस्थित होते.
     यावेळी भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की, वारीचं महत्व नवीन पिढीला “अंतर्नाद” मधून कळेल आणि त्यांना प्रेरणा मिळेल. संतांविषयी अनेक साहित्य, अभंग आहेत. परंतु या नाटकात त्याची आम्ही कॉपी केली नाही तर सर्व नवीन आहे. लोकसंगीतात वापरली जाणारी बहुतांशी सर्व वाद्य या संगीत नाटकात वापरली आहेत. आपल्या अंतरात्म्याचा आवाज समजून घेण्यासाठी आपण अंतर्नाद पहावे. संगीत, भक्ती आणि कलेचा वारसा जपणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक विश्वात ‘मोरया थिएटर्स’ एक नवी कोरी कलाकृती घेऊन येत आहे. पंढरीच्या वारीचा आणि आत्म्याचा प्रवास मांडणाऱ्या या भव्य संगीत नाटकाचा दुसरा प्रयोग हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात शुक्रवारी (दि. २२ मे), सायंकाळी सात वाजता होणार आहे. रसिक प्रेक्षकांसाठी या नाटकाची तिकिटे ‘बुक माय शो’ आणि ‘तिकीट खिडकी’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. तसेच चिंचवड येथील नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीवरही विक्री सुरू आहे अशी माहिती दिग्दर्शक मनोज डाळिंबकर यांनी दिली.
    नाटकाचे कथानकः “अंतर्नाद” हे केवळ नाटक नसून तो आत्म्याशी संवाद साधणारा एक भावस्पर्शी प्रवास आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या पवित्र भूमीकडे निघालेल्या माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आणि त्यातील वारकऱ्यांच्या श्रद्धेचे जिवंत चित्रण यात पाहायला मिळेल. दिंडीत सहभागी झालेल्या एका युवा वारकऱ्याची विठ्ठल भक्ती आणि त्यातून घडलेला त्याचा अंतर्मनातील प्रवास म्हणजे ‘अंतर्नाद’ होय. या नाटकाचा निर्माता म्हणून काम करताना, वारकरी परंपरेला अभिवादन करणारी ही आधुनिक कलाकृती रसिकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल, असा मला विश्वास भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केला.
    नाटकाचे लेखन विनोद रत्ना यांनी केले असून, संकल्पना व दिग्दर्शन मनोज डाळींबकर यांचे आहे. संगीत निरंजन पेडगावकर यांनी दिले आहे आणि मुराद तांबोळी यांनी गीते शब्दबद्ध केली आहेत. नृत्यदिग्दर्शन अंकिता शिवतरे व सौगंध कापसे यांनी केले आहे. तांत्रिक बाजू अभिप्राय कामठे (प्रकाश योजना), कमलेश बिचे (रंगभूषा) आणि वेदिका काळे (वेशभूषा) यांनी सांभाळली आहे. सहाय्यक दिग्दर्शन आकाश थिटे यांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!