शबनम न्यूज | प्रतिनिधी
फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पुढाकारातून एमआयडीसी परिसरातील कामगार बंधू-भगिनींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या अंतर्गत बस वाहतूक सेवेचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या एमआयडीसी परिसरात सुमारे ७५ किलोमीटरचे अंतर्गत रस्ते असून जवळपास ७ ते ८ हजार लघु-मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांमध्ये हजारो महिला कामगारांसह मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग दररोज कामासाठी ये-जा करतो.

विशेष बाब म्हणजे, एमआयडीसी स्थापन होऊन जवळपास पाच दशके उलटून गेल्यानंतरही येथे अंतर्गत सार्वजनिक बस वाहतूक सेवा उपलब्ध नव्हती. परिणामी, कामगारांना कंपन्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागत होती. वेळेवर कामावर पोहोचण्यात अडचणी निर्माण होत होत्या. विशेषतः महिला कामगारांना सुरक्षेच्या गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागत होते. अनेक वेळा छेडछाडीचे प्रकार, मोबाईल चोरी व खेचण्याच्या घटना घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होत असे.
या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली अंतर्गत बस सेवा ही कामगारांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. या सेवेच्या प्रारंभामुळे आज संपूर्ण एमआयडीसी परिसरात कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
पुढील काळात एमआयडीसीच्या सर्व भागांमध्ये ही बस सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. सध्या पिंपरी एमआयडीसी अंतर्गत भोसरी एमआयडीसी अंतर्गत मार्ग तसेच निगडी भोसरी मार्ग सुरू करण्यात आला असून विविध महत्त्वाच्या ठिकाणी बस थांबे निश्चित करण्यात आले आहेत.
या उपक्रमासाठी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अभय दादा भोर यांनी विशेष पुढाकार घेतला.
सदर कार्यक्रमास पिंपरी आगार व्यवस्थापक श्री. शेखर नाईक, पिंपरी आगारचे सिनियर ट्रॅफिक इन्स्पेक्टर श्री. अनिल रासकर, एमआयडीसी रिजन एरिया मॅनेजर सौ. राजश्री देशमुख ,उद्योग सुविधा केंद्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे श्री. विजय बावरे,, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद ढोले, भोसरी एमआयडीसी पोलीस निरीक्षक मिसाळ साहेब, पीएमपीएमएलचे वरिष्ठ अधिकारी श्री. सचिन गायकवाड तसेच असंख्य उद्योजक आणि कामगार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला लघु उद्योजक संघटनेच्या अध्यक्षा तसेच दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कु. दुर्गा भोर यांनी केले. तर आभार प्रदर्शन उद्योजक श्री. शिवाजीराव पाटील यांनी केले.


