पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड शहरात सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा नागरिकांना लक्ष्य करत मोठी आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. “तुमचे MNGL गॅस कनेक्शन बंद होणार असून थकीत बिल तात्काळ भरा” असा बनावट संदेश पाठवून एका नागरिकाची तब्बल १ लाख ५८ हजार ८०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ६ मे २०२६ रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ७ मे २०२६ दरम्यान नेवाळे वस्ती, चिखली परिसरात घडली. फिर्यादीच्या मोबाईलवर MNGL GAS कनेक्शन कट होणार असल्याचा मेसेज आला होता. तसेच थकीत गॅस बिल तात्काळ भरा असे सांगत आरोपीने “BIN MNGL BILL UPDATE” नावाची फाईल पाठवली होती.
फिर्यादीने त्या मेसेजवर विश्वास ठेवून संबंधित फाईल ओपन केली. त्यानंतर अवघे १२ रुपये थकीत गॅस बिल भरण्यासाठी अॅपमध्ये स्वतःच्या क्रेडिट कार्डची माहिती भरली. मात्र त्यानंतर आरोपीने फिर्यादीचा मोबाईल हॅक करून त्यांच्या साउथ इंडियन बँकेच्या वनकार्ड क्रेडिट कार्डमधून वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे पैसे ट्रान्सफर केले.
सायबर भामट्यांनी
ट्रान्झॅक्शन आयडी १६६८६२५२४७ वरून – ₹४९,०००
ट्रान्झॅक्शन आयडी १६६८६२९१४० वरून – ₹४९,८००
ट्रान्झॅक्शन आयडी १६६८६४०२६२ वरून – ₹५०,०००
ट्रान्झॅक्शन आयडी १६६८६४३५२७ वरून – ₹१०,०००
अशा एकूण ₹१,५८,८०० रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६(२), ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(डी) अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद लिंक, APK फाईल किंवा बिल अपडेट संदेशांवर विश्वास ठेवू नये, तसेच बँक व कार्डची माहिती कोणत्याही अॅपमध्ये भरताना सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


