पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
आळंदी येथे पीएमटी बस स्टॉप परिसरात निष्काळजीपणे बस पार्क करताना झालेल्या भीषण अपघातात एका अनोळखी व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी पीएमटी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ११ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास आळंदी पीएमटी बस स्टॉप येथे घडली. आरोपी हनुमान ज्ञानोबा जाधव (वय २७), व्यवसाय पीएमटी बस चालक, मूळ रा. कापसी, ता. पालन, जि. परभणी, सध्या रा. पुणेकर बिल्डिंग, चाकण चौक, आळंदी याने त्याच्या ताब्यातील पीएमटी बस स्टॉपवर पार्क करत असताना निष्काळजीपणे व परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालविले.
यावेळी बसच्या उजव्या बाजूच्या मागील चाकाखाली एका अनोळखी पुरुष व्यक्तीचे डोके आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत इसमाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून त्याने अंगात जांभळ्या रंगाचा टी-शर्ट, त्यावर पांढरे व निळे पट्टे आणि निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट परिधान केली होती.
या प्रकरणी पोलीस हवालदार राजेंद्र विक्रम कोल्हे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०६(१), २८१ तसेच भादंवि कलम २७९, ३०४(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काकडे करीत आहेत.


