पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
भोसरीतील चक्रपाणी वसाहत परिसरात प्रेमसंबंधाच्या संशयातून एका तरुणावर चौघांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवीगाळ, दमदाटी करत दांडके आणि दगडाने मारहाण करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. १० मे २०२६ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास राम मंदिर हायस्कूलजवळ, रामनगर, चक्रपाणी वसाहत परिसरात घडली. फिर्यादी शुभम भगवान दुतोंडे (वय २२) हे त्यांच्या राहत्या घरासमोर बसलेले असताना आरोपींनी त्यांच्याशी वाद घालत अचानक हल्ला चढविला.
आरोपी बंटी गायकवाड, सुमित शिंदे, पप्पू गायकवाड आणि आदित्य सावद यांनी फिर्यादीचे आरोपी क्रमांक ३ च्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत संतापाच्या भरात शिवीगाळ व दमदाटी सुरू केली. त्यानंतर चौघांनी मिळून फिर्यादीला हाताने, लाथाबुक्यांनी, दांडक्याने तसेच रस्त्यावर पडलेल्या दगडाने बेदम मारहाण केली.
या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५) तसेच भादंवि कलम ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार ढेकणे करीत आहेत.


