spot_img
spot_img
spot_img

“जागा द्या” म्हणताच संताप; हिंजवडीत स्क्रू-ड्रायव्हरने दोघांवर हल्ला

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

हिंजवडी परिसरात वाईन शॉपबाहेर जागा देण्याच्या किरकोळ कारणावरून दोन मित्रांवर स्क्रू-ड्रायव्हरने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली असून, धारदार स्क्रू-ड्रायव्हरने डोक्यावर वार करून दोघांना जखमी केले. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. १० मे २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भरणेवस्ती, माण येथील विशाल वाईन शॉपसमोर घडली. फिर्यादी सचिन गोवर्धन सुर्वे (वय ३८) आणि त्यांचे मित्र अनिल हरी गायकवाड हे दोघेजण वाईन शॉपमधून दारूचे पार्सल घेऊन बाहेर येत होते.

यावेळी रस्त्यात उभे असलेले आरोपी संतोष साळवे आणि त्याचे तीन साथीदार यांना फिर्यादींनी “आम्हाला बाहेर जायचे आहे, कृपया जागा द्या,” असे सांगितले. मात्र, या बोलण्याचा राग आल्याने आरोपींनी दोघांशी वाद घालत शिवीगाळ सुरू केली.

काही क्षणांतच हा वाद हिंसक झाला आणि आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी आरोपी संतोष साळवे याने जवळील स्क्रू-ड्रायव्हरने फिर्यादीच्या डोक्यावर आणि तोंडावर वार करून जखमी केले. तसेच अनिल गायकवाड यांच्या डोक्यावरही स्क्रू-ड्रायव्हरने वार करण्यात आला.

या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२, ३(५) तसेच भादंवि कलम ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वांगणेकर करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!