पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
विश्वासाने घराची चावी दिल्यानंतर त्याचाच गैरफायदा घेत तब्बल साडेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना बोपखेल परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिघी पोलिसांनी पंजाबमधील एका तरुणाविरोधात चोरी आणि धमकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना ६ मे ते १० मे २०२६ दरम्यान शिवनंदन पार्क, गणेशनगर, बोपखेल येथील फ्लॅट क्रमांक २०३ मध्ये घडली. याप्रकरणी मनीषा दिपक हिरवळे (वय ३८) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीषा हिरवळे या काही दिवसांसाठी कोल्हापूर येथे गेल्या होत्या. घरातील मांजरींना खायला देण्यासाठी त्यांनी विश्वासाने घराची चावी आरोपी अवतार सिंघविर सिंघ सोहल याच्याकडे दिली होती. आरोपी हा सध्या बोपखेल परिसरात भाड्याने राहत असून मूळचा पंजाबमधील जालंधर येथील रहिवासी आहे.
दरम्यान, ७ मे रोजी आरोपीने फिर्यादीला फोन करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “काम सोडून चार-चार दिवस निघून जाते, आता तुला दाखवतो… तुझा जीव घेतो… तुला माझ्या मागे पंजाबपर्यंत यायला लावतो,” अशी धमकीही आरोपीने दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर फिर्यादी घरी परतल्यानंतर घरातील लाकडी कपाटातील ड्रॉवरचे लॉक उघडून ठेवलेले दिसून आले. तपासणी केली असता १४ तोळे ९ ग्रॅम वजनाचे सुमारे ४ लाख ४७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे उघड झाले.
या प्रकरणी दिघी पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३१६(२) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे बोपखेल परिसरात खळबळ उडाली असून, विश्वासू व्यक्तींनाही घराची जबाबदारी देताना नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


