spot_img
spot_img
spot_img

चऱ्होलीत कोयते घेऊन फिरणाऱ्या टोळीवर पोलिसांची कारवाई; एकाला अटक, दोघे फरार

मनाई आदेश धाब्यावर बसवून धारदार शस्त्रांसह फिरत होते युवक; दिघी पोलिसांची मध्यरात्री कारवाई

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

पिंपरी चिंचवड शहरात लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करत धारदार कोयते बाळगणाऱ्या युवकांवर दिघी पोलिसांनी कारवाई केली आहे. चऱ्होली परिसरात मध्यरात्री करण्यात आलेल्या या कारवाईत एका युवकाला अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार झाले आहेत.

ही घटना ९ मे रोजी पहाटे १.४० वाजण्याच्या सुमारास वाघेश्वर विद्यालयाजवळ, साठे वस्ती, कोतवालवाडी, चऱ्होली येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलीस शिपाई बाबाजी मारुती जाधव यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वाघेश्वर कृष्णा रसाळ (वय १९) याच्यासह त्याचे साथीदार अथर्व तानाजी शिंदे आणि कृष्णा वाघोले हे धारदार कोयते घेऊन परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.

यावेळी आरोपींकडून सुमारे ८०० रुपये किमतीचे दोन लोखंडी कोयते जप्त करण्यात आले. पोलिसांनी वाघेश्वर रसाळ याला ताब्यात घेतले असून अथर्व शिंदे आणि कृष्णा वाघोले हे दोघे फरार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विशेष म्हणजे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत दगड, शस्त्रे, तलवारी, कोयते, लाठ्या किंवा इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बाळगण्यास मनाई करणारे आदेश लागू असतानाही आरोपी हे कोयते घेऊन फिरत होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात वाढत्या कोयता गँगच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!