२४ हजारांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त; दापोडी पोलिसांची कारवाई
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
दापोडी रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूस सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर दापोडी पोलिसांनी धाड टाकत ‘तीन पत्ती’ जुगार खेळणाऱ्या चौघांवर कारवाई केली. या कारवाईत रोख रकमेसह एकूण २४ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई रविवारी (दि.१० मे) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लिंभोरे वस्ती, दापोडी परिसरातील पत्राशेडमध्ये करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई सागर आनंद जाधव यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीररित्या ‘तीन पत्ती’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी आरोपी जुगार खेळताना रंगेहाथ आढळून आले.
कारवाईदरम्यान अशोक जगन्नाथ भालेसैन (वय ५२), विशाल ज्ञानेश्वर सोनवणे (वय ४४), चेतन किसन भाडाळे (वय ३६) आणि मनोज दिलीप पवार (वय ४०) या चौघांविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही आरोपींना बीएनएसएस कलम ३५(३) प्रमाणे नोटीस देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईमुळे दापोडी परिसरातील अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाईचा इशारा दिला आहे. पुढील तपास दापोडी पोलीस करत आहेत.


