पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पिंपरी शहरातील शगुन चौक परिसरात अनैतिक व्यवसायाविरोधात पोलिसांनी कारवाई करत एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक रस्त्यावर उभे राहून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अश्लील हावभाव व इशारे करून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप संबंधित महिलेवर करण्यात आला आहे.
ही कारवाई दि. ८ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आंबेडकर पुतळा चौकाकडून शगुन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, सिटी प्लाझा लॉजसमोरील सार्वजनिक ठिकाणी करण्यात आली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस हवालदार उदयकुमार बाळासाहेब भोसले यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आरोपी सार्वजनिक ठिकाणी उभी राहून शब्द उच्चारत, डोळ्यांनी खुणावत तसेच हातवारे करून लैंगिक हावभाव करत नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होत होता तसेच सार्वजनिक शिष्टाचार आणि सभ्यतेचा भंग होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून तपास पोलीस उपफौजदार जगताप करीत आहेत.
दरम्यान, शगुन चौक परिसरात वाढत्या अनैतिक व्यवसायाच्या हालचालींमुळे स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.


