spot_img
spot_img
spot_img

गांजा मिश्रीत ‘बंटा गोळी’ विक्रीचा मोठा पर्दाफाश

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड शहरात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत गांजा मिश्रीत “बंटा गोळी” विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत तब्बल १४९ किलो ७१५ ग्रॅम वजनाच्या गुंगीकारक बंटा गोळ्या, प्रतिबंधित गुटखा आणि मोबाईल असा एकूण २ लाख ४१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस उपआयुक्त गुन्हे शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक सक्रिय झाले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक जिलाणी मोमीन यांना गुप्त माहिती मिळाली की, नानेकरवाडी (ता. खेड, जि. पुणे) परिसरातील एका भाड्याच्या खोलीत गांजा मिश्रीत “बंटा” नावाच्या गुंगीकारक गोळ्यांची बेकायदेशीर विक्री सुरू आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकत आरोपी राहुलसिंग हेमराजसिंग लोदी (वय २५) याला ताब्यात घेतले. आरोपी हा मूळचा मध्यप्रदेश येथील असून सध्या नानेकरवाडी येथे वास्तव्यास होता.

छाप्यामध्ये आरोपीकडून —
१४९ किलो ७१५ ग्रॅम गांजा मिश्रीत “बंटा गोळी” महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा एक मोबाईल फोन असा एकूण २,४१,७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी दक्षिण चाकण पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस अॅक्ट १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(ब)(ii)(क), २९ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास दक्षिण चाकण पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक जिलाणी मोमीन, निखिल शेटे, कपिलेश इगवे, निखिल वर्षे, सदानंद रुद्राक्षे, सपकाळ आदींच्या पथकाने सहभाग घेतला. तसेच पोलीस अंमलदार सुभाष गुरव यांनी तांत्रिक विश्लेषणासाठी मदत केली.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ८६००००२३२० या क्रमांकावर, पोलीस हेल्पलाईन ११२ किंवा मानस हेल्पलाईन १९३३ वर संपर्क साधावा.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!