पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पिंपरी चिंचवड शहरातील चऱ्होली परिसरात रविवारी मध्यरात्री भीषण दुर्घटना टळल्याची घटना समोर आली आहे. चऱ्होली येथील अटलांटिका सोसायटीमध्ये अचानक पीएनजी गॅसची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे सोसायटीतील जवळपास २०० हून अधिक कुटुंबांचे जीव धोक्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास सोसायटी परिसरात तीव्र गॅसचा वास येऊ लागल्याने रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. काही नागरिकांनी तत्काळ ही माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण परिसराची पाहणी सुरू केली.
तपासादरम्यान पीएनजी गॅस लाईनमधून गळती होत असल्याचे निदर्शनास आले. गॅस गळतीमुळे कोणत्याही क्षणी मोठा स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे अग्निशमन विभागाने तातडीने परिसर रिकामा करण्याच्या सूचना देत खबरदारीचे उपाय सुरू केले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत गॅस गळतीवर नियंत्रण मिळवले आणि संभाव्य मोठी दुर्घटना टाळली. वेळेत कारवाई झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून नागरिकांनी अग्निशमन दलाचे आभार मानले आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर सोसायटीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पीएनजी गॅस लाईनच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित यंत्रणेकडून गॅस गळतीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.


