भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत धक्कादायक प्रकार; “पुण्यात राहायचे असेल तर गप्प बस” अशी धमकी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
भोसरीतील चक्रपाणी वसाहत परिसरात कौटुंबिक वादातून मारहाणीची गंभीर घटना घडली आहे. पत्नीच्या मोबाईलमधील संभाषणाची रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर झालेल्या वादातून तिघांनी मिळून एका व्यक्तीला लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता “पुण्यात राहायचे असेल तर गप्प बस, नाहीतर सोडणार नाही” अशी धमकी देत संबंधित व्यक्तीच्या पत्नीला सोबत घेऊन गेल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५, ३५१(३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २७ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास चक्रपाणी वसाहत, मधुबन सोसायटी, भोसरी येथे घडली. फिर्यादी विनायक चिंतामण घोडे (वय ३५, व्यवसाय पेंटिंग) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार, पत्नी सविता हिच्या मोबाईलमध्ये आरोपी क्रमांक १ यादव याच्यासोबतचे संभाषणाचे रेकॉर्डिंग त्यांनी ऐकले होते. त्याबाबत पत्नीला जाब विचारल्यानंतर तिने तिचे आई-वडील, भाऊ आणि ठेकेदार यादव यांना घरी बोलावले.
यानंतर ठेकेदार यादव याने हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी प्रकाश बाळू उंबरे आणि योगेश बाळू उंबरे यांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच आरोपींनी “माझ्या बहिणीला काही विचारायचे नाही, पुण्यात राहायचे असेल तर तिला त्रास द्यायचा नाही, नाहीतर तुला सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. मारहाणीनंतर आरोपी फिर्यादीची पत्नी सविता हिला सोबत घेऊन गेल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास पोलीस हवालदार चपटे करीत आहेत.


