गळ्यावर ब्लेडने वार; आरोपी प्रियकर अटकेत
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुण्यातील चंदननगर परिसरात प्रेमप्रकरणातून एका तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकतर्फी प्रेम आणि सुरू असलेल्या वादातून संतप्त झालेल्या युवकाने तरुणीच्या घरात घुसून तिच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप राठौड आणि पीडित तरुणी हे दोघेही एका मॉलमध्ये काम करत होते. कामाच्या ठिकाणी दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. याच रागातून आरोपी दिलीप राठौड हा तरुणीच्या घरी पोहोचला आणि संधी साधून तिच्यावर ब्लेडने हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या तरुणीने आपल्या भावाला फोन करून, “लवकर घरी ये… एका मुलाने मला मारलं आहे… माझ्या गळ्यातून आवाज येत नाही,” असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर तिने भावाला व्हिडिओ कॉल केला. त्या वेळी ती रक्ताच्या थारोळ्यात दिसत होती.
दरम्यान, पोलिस रुग्णालयात पोहोचले तेव्हा तरुणी बोलण्याच्या स्थितीत नव्हती. तिने इशाऱ्याने पेन आणि कागद मागवून त्यावर “दिलीप राठौड” असे नाव लिहून आरोपीची ओळख पटवून दिली.
या घटनेनंतर चंदननगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.




Total Users : 227951