‘हिरा ग्रुप’च्या संचालिकेविरोधात संत तुकारामनगर पोलिसांत गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब
वार्षिक ३६ टक्के परताव्याचे आमिष दाखवून पिंपरीतील गुंतवणूकदार व त्यांच्या वडिलांची तब्बल २५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ‘हिरा ग्रुप’च्या संचालिकेविरोधात संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सलीम लालमोहंमद हन्नूरे (वय ५२, रा. औदुंबर नेस्ट, मोरवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी डॉ. नोहेरा शेख, मालकीण हिरा ग्रुप, हैदराबाद (तेलंगाणा) यांनी २०१७ साली जास्त आर्थिक परताव्याचे आमिष दाखवत फिर्यादी व त्यांच्या वडिलांकडून मोठी गुंतवणूक करून घेतली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी वार्षिक ३६ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिल्याने फिर्यादी यांनी २१ लाख रुपये तर त्यांच्या वडिलांनी ४ लाख रुपये अशी एकूण २५ लाख रुपयांची गुंतवणूक हिरा ग्रुपमध्ये केली होती. सुरुवातीला आरोपींकडून ७९ हजार रुपयांचा काही आर्थिक परतावा देण्यात आला. मात्र त्यानंतर विविध कारणे सांगून उर्वरित रक्कम आणि परतावा देण्यास टाळाटाळ करण्यात आली.
दरम्यान, आरोपी डॉ. नोहेरा शेख यांच्या विरोधात देशभरात अशाच प्रकारच्या आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाल्याचेही समोर आले आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. जानेवारी २०२१ पर्यंत त्या कारागृहात होत्या.
जामिनावर सुटल्यानंतर आरोपींनी पुण्यातील गुंतवणूकदारांची येरवडा येथे बैठक घेत सर्वांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे फिर्यादींनी त्यावेळी तक्रार दाखल केली नव्हती. मात्र अनेक वर्ष उलटल्यानंतरही गुंतवलेली रक्कम परत न मिळाल्याने अखेर पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १९०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६(२), ३१८(४) तसेच फसवणुकीसंदर्भातील कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गाडेकर करीत आहेत.


