spot_img
spot_img
spot_img

इंस्टाग्राम स्टोरीच्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब

सोशल मीडियावरील इंस्टाग्राम स्टोरीच्या कारणावरून वाकड परिसरात एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून परिसरात कोयते फिरवत दहशत निर्माण करणाऱ्या चौघांविरोधात वाकड पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ५ मे २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास माऊली चौक, दत्त मंदिर रोड, वाकड येथे घडली. याप्रकरणी संगिता आकाश जाधव (वय ४९, रा. माऊली चौक, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादींचा मुलगा उत्कर्ष आकाश जाधव याने आरोपींपैकी एका अल्पवयीन मुलास त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर उत्कर्षला उद्देशून ठेवलेल्या स्टोरीबाबत जाब विचारला होता. याच किरकोळ कारणाचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत करून उत्कर्षवर हल्ला केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय उर्फ सोन्या रामेश्वर पांचाळ (वय १८), सुरज भुजबळ (वय अंदाजे २२) तसेच दोन विधिसंघर्षित बालकांनी उत्कर्ष जाधव याच्यावर कोयत्याने वार केले. आरोपींनी उत्कर्षच्या डोक्यावर आणि पायावर सपासप वार करत त्याला गंभीर जखमी केले.

हल्ल्यानंतर आरोपींनी हातातील कोयते हवेत फिरवत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेमुळे माऊली चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २३५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३(५), क्रिमिनल लॉ अॅक्ट कलम ३ व ७ तसेच आर्म अॅक्ट कलम ४(२५) आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम ३०७, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपी दत्तात्रय उर्फ सोन्या पांचाळ याला पोलिसांनी अटक केली असून दोन विधिसंघर्षित बालकांना समजपत्र देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि देशमुख करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!