लोखंडी रॉडने डोक्यात वार; चौघांविरोधात चिखली पोलिसांत गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब
कुदळवाडी परिसरात व्यवहाराचे राहिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या तरुणावर चौघांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफताब आलम अब्दुल मन्नान शेख (वय २८, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. ५ मे २०२६ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास रविरंजन वजन काट्याच्या पाठीमागील दुकान परिसरात ही घटना घडली.
फिर्यादी अफताब शेख हे त्यांचे व्यवहाराचे थकित पैसे मागण्यासाठी आरोपी मुस्ताक चौधरी याच्याकडे गेले होते. यावेळी पैशांच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपी मुस्ताक चौधरी याने फिर्यादीस शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, इरशाद चौधरी, मुमताज चौधरी आणि फिरोज चौधरी हे देखील घटनास्थळी आले. चौघांनी मिळून अफताब शेख यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच आरोपी इरशाद चौधरी याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर आणि गळ्यावर वार करून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २७७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५५, ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी संबंधित आरोपींना नोटीस बजावली असून पुढील तपास सुरू आहे.


