शबनम न्यूज | प्रतिनिधी
पवना नदीतील भीषण प्रदूषणाचा मुद्दा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार गाजला. शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांनी निट्ल लॅबोरेटरीजच्या धक्कादायक अहवालाचा आधार घेत प्रशासनावर तुफानी हल्लाबोल करत, “पवना नदी आज नदी राहिली नाही, ती सांडपाण्याचा नाला बनली आहे. प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करत आहे,” असा आरोप केला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवी लांडगे होते.
बारणे यांनी प्रत्यक्ष केलेल्या नदी पाहणीचा हवाला सभागृहात दिला. आपल्या आक्रमक भाषणात अहवालातील आकडेवारी सभागृहात मांडत प्रशासनाचे अक्षरशः धिंडवडे काढले. “Total Coliform 1600 पर्यंत पोहोचले आहे, जे मानकाच्या तिप्पटपेक्षा जास्त आहे. याचा सरळ अर्थ म्हणजे नदीत मलमूत्र आणि सांडपाणी खुलेआम सोडले जात आहे. हे पाणी म्हणजे आजारांचे घर बनले आहे,” असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे पाण्यातील ऑक्सिजनची स्थिती उघड करत संताप व्यक्त केला. “Dissolved Oxygen 1 mg/l पेक्षा कमी आहे. म्हणजे नदी जिवंतच राहिलेली नाही. मासे मरत आहेत, दुर्गंधी पसरते आहे आणि संपूर्ण परिसंस्था नष्ट होत आहे. ही परिस्थिती अत्यंत लज्जास्पद आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
सांडपाण्यामुळे वाढलेल्या BOD आणि COD पातळीवरूनही बारणे यांनी प्रशासनाला कोंडीत पकडले. “BOD 14 mg/l आणि COD 76.8 mg/l म्हणजे औद्योगिक व रासायनिक कचरा मोठ्या प्रमाणावर नदीत मिसळतोय. मग STP प्रकल्प नेमके करत काय आहेत? कोट्यवधींचा निधी गेला कुठे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“अहवाल स्पष्ट सांगतो की हे पाणी कोणत्याच मानकांची पूर्तता करत नाही आणि पिण्यासाठी पूर्णतः अयोग्य आहे. तरीही नागरिकांना सुरक्षित पाणी देण्याबाबत प्रशासन गप्प का? या निष्काळजीपणाची जबाबदारी कोण घेणार?” असा थेट प्रश्न बारणे यांनी उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला.
नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधताना त्यांनी इशारा दिला की, “हेच पाणी भूजलात मिसळले, शेतीत वापरले किंवा नागरिकांपर्यंत पोहोचले, तर टायफॉईड, कॉलरा, कावीळ, त्वचारोग यांसारख्या गंभीर आजारांचा उद्रेक होऊ शकतो. प्रशासन झोपेत आहे का,” असा संतप्त सवालही त्यांनी केला.
सभागृहात वातावरण तापले असताना बारणे यांनी शेवटी ठाम इशारा दिला की, “पवना नदीचा हा प्रश्न केवळ पर्यावरणाचा नाही, तर लाखो नागरिकांच्या जीविताचा आहे. तात्काळ कठोर कारवाई झाली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.”
या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते, प्रशासनावर आता ठोस कारवाईचा दबाव वाढला आहे.




Total Users : 239542