पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
हिंजवडी पोलीसांनी अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत बोडकेवाडी (ता. मुळशी) येथे मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला असून एका इसमाला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.१० वाजण्याच्या सुमारास बोडकेवाडी येथील शंकर बोडके यांच्या पत्र्याच्या शेडजवळ संशयित हालचालींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी आरोपी संजय विश्वनाथ राय (वय ५७) याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे १५७१ ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे ७८,५०० रुपये) आढळून आला.
सदर गांजा हा बेकायदेशीररित्या विक्रीसाठी साठवून ठेवला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी हा मूळचा पश्चिम बंगाल राज्यातील असून सध्या बोडकेवाडी येथे वास्तव्यास होता.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८५/२०२६ नुसार एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
या कारवाईचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांदे करीत असून, आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात वाढत्या अंमली पदार्थांच्या हालचालींवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.



