हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन; विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल जप्त
प्रतिनिधी – युनूस खतीब | पिंपरी-चिंचवड
पिंपळे सौदागर परिसरात विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या युवकाला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. हत्यारबंदी आदेश लागू असताना आरोपीकडून शस्त्र सापडल्याने ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ मे २०२६ रोजी रात्री ८ ते ८.४५ वाजण्याच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील बस स्टॉपजवळील मोकळ्या मैदानात ही कारवाई करण्यात आली. अभिषेक अशोक भंडारी (वय २७, रा. धनकवडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून दि. २९ एप्रिल ते १२ मे २०२६ या कालावधीत घातक शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश जारी करण्यात आलेला होता. या आदेशाचे उल्लंघन करत आरोपीने त्याच्या ताब्यात देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस, एकूण अंदाजे ५१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल बाळगला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शस्त्र जप्त केले.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दि. ३ मे २०२६ रोजी रात्री १०.४० वाजता नोंदवण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत असून आरोपीकडून आणखी माहिती घेतली जात आहे.



