spot_img
spot_img
spot_img

डिजिटल जनगणनेत सहभागी व्हा, देशाच्या प्रगतीत हातभार लावा!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात १६ व्या राष्ट्रीय जनगणनेचा ऐतिहासिक टप्पा सुरू झाला आहे. १ मे २०२६ पासून देशभरात ‘स्व-गणनेला’ (Self-Enumeration) प्रारंभ झाला असून, पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी या पहिल्या डिजिटल जनगणनेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

आमदार महेश लांडगे यांनी आज स्वतः आपल्या कुटुंबीयांसह ऑनलाइन पद्धतीने स्व-गणना पूर्ण केली. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी सुरज टिंगरे, किरण गव्हाणे, अरुण गुंडगळ, राहुल शेडगे उपस्थित होते.

या मोहिमेबाबत माहिती देताना आमदार लांडगे म्हणाले की, “ही देशातील पहिली डिजिटल जनगणना असून प्रत्येक नागरिकाचा सहभाग यामध्ये मोलाचा आहे. महाराष्ट्रभरातील जनतेने १ ते १५ मे या कालावधीत se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या कुटुंबाची माहिती भरावी आणि आपली जबाबदारी पार पाडावी.”

‘आपली जनगणना, आपला विकास’
“आपली जनगणना, आपला विकास हा मंत्र समोर ठेवून आपण सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून या प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. डिजिटल माध्यमाचा वापर करून आपली माहिती अचूकपणे नोंदवल्यास देशाच्या भविष्यातील नियोजनाला गती मिळेल,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आमदार लांडगे यांनी स्वतः पुढाकार घेतल्यामुळे शहरात या मोहिमेबाबत जनजागृती निर्माण होत असून, जास्तीत जास्त नागरिकांनी १५ मे पूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीनेही करण्यात आले आहे.

“देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अचूक माहिती असणे ही काळाची गरज आहे. १६ व्या राष्ट्रीय जनगणनेच्या निमित्ताने प्रथमच आपल्याला ‘डिजिटल स्व-गणने’ची संधी मिळाली आहे. मी माझे कर्तव्य पार पाडले आहे, तुम्हीही आजच आपली नोंदणी पूर्ण करा आणि जबाबदार नागरिकत्वाचा परिचय द्या. आपली जनगणना, आपला विकास’ हा मंत्र केवळ शब्द नसून ती आपल्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे. चला, डिजिटल जनगणनेत सहभागी होऊन सशक्त भारताच्या निर्मितीत आपले योगदान देऊया!

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!